Tuesday, 15 November 2016

तक्रारी ऐकण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅप सेवा

तक्रारी ऐकण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅप सेवा

मुंबई : देशातील काळा पैसा, भ्रष्टाचार, दहशतवाद आणि बनावट नोटा यांचा कणा मोडण्यासाठी केंद्राने पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सर्व सामन्य नागरिकांना येणाऱ्या अनेक अडचणीं, तक्रारी ऐकून त्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सज्ज झाले आहेत. राज्यातील पोलीस आयुक्तालये आणि पोलीस जिल्हा मुख्यालयांच्या स्तरावर प्रत्येकी दोन मोबाईल नंबर नागरिकांच्या सेवेत आणले आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेने पाचशे आणि एक हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे जुन्या नोटा बदलण्यासाठी नागरिकांनी बँका आणि एटीएमवर गर्दी केली आहे. तसेच पेट्रोलपंप, रेल्वे स्थानके, प्रशासकीय कार्यालये, हॅस्पीटल, मेडीकल याठिकाणीही नागरीकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अशा तक्रारी करण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅप, एसएमएस, कॉल करण्यासाठी पोलिसांनी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक स्वतंत्र नंबर दिला आहे. या तक्रारी संबधित प्राधिकरणांना पाठवून त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे राज्य पोलीस महासंचालक कार्यालयातील अधिकाऱ्याने स्पष्ट केले. नोटांवरून सुरू असलेल्या राजकारणानंतर पोलिसांनी सुरू केलेल्या उपक्रमाचा नक्कीच फायदा जनतेला होणार असून काळ्या पैशांच्या व्यवहार, अवैध देवाण-घेवाणीची माहितीही पोलिसांना मिळणार आहे. (प्रतिनिधी)

जाहीर केलेले नंबर-

राज्य पोलीस नियंत्रण कक्ष - ७५०६७७७१००, ५०६८८८१००, मुंबई पोलीस-७७३८१३३१३३, ७७३८१४४१४४, नवी मुंबई - ८४२४८२०६६५, ४२४८२०६८६, ठाणे शहर - ९७६९७२४१२७, ९९६९३६५१००, नागपुर शहर - ८०५५८७६७७३,८०५५४७२४२२, नाशिक शहर- ८३९०८२१९५२, ८३९०८२२३५२, ९९२३०७८६९६, आरंगाबाद शहर-८३९००२२२२२, ७७४१०२२२२२,ठाणे ग्रामीण- ७०४५१००१११, ७०४५१००२२२, पालघर -९७३०८११११९, ९७३०७११११९, रायगड - ७०५७६७२२२७,७०५७३६२२२६, रत्नागिरी - ८८८८५०६१८१, ८८८८९०५०२२, सिंधुदूर्ग - ८२७५७७६२१३,८२७५७७६२१६, मुंबई रेल्वे - ९८३३३१२२२२.

या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

स्टेटस टॅब' हे व्हॉट्स अॅपचे नवं फीचर !

व्हॉट्स अॅपचं सध्या 'स्टेटस टॅब'वर काम सुरु आहे. नुकतंच व्हिडिओ कॉलिंग फीचर लाँच केल्यानंतर आता व्हॉट्स अॅपचं नवं इंटरफेज समोर आलं आहे.

या स्टेटस बारमुळे तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्टसोबत तुमचा फोटो निश्चित वेळेपर्यंत शेअर करु शकता. हे फीचर बरचंस इंस्टाग्रामचं स्टोरी आणि स्नॅपचॅटच्या स्टोरीसारखं आहे.

ज्यामध्ये फोटो क्लिक करुन त्यात टेक्स्ट आणि इमोजी अॅड करु शकतो. हे फोटो कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असणाऱ्या लोकांना एका निश्चित वेळेपर्यंत दिसेल.

यासोबतच यूजर आपलं स्टेट्स काही मोजक्या लोकांसाठी ठेऊ शकतो. किंवा सर्व कॉन्टॅक्ट्ससाठी ठेऊ शकतो. काही दिवसांपूर्वीच व्हॉट्स अॅपनं आपलं व्हिडिओ कॉलिंग फीचर सुरु केलं आहे.

Monday, 14 November 2016

ATM मधून लवकरच येणार 20 आणि 50 च्या नोटा

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 14 - स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून लवकरच 20 आणि 50 रुपयांच्या नोटा येणार आहेत, अशी माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी दिली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून 500 आणि 1000च्या नोटा बंद केल्यानंतर 100 रुपयांच्या नोटा एटीएममधून उपलब्ध करून दिल्या जात आहे. तसेच 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याने बँकांमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते आहे. त्यानंतर आता एक पाऊल पुढे टाकत ग्राहकांच्या सुविधेसाठी 20 आणि 50 रुपयांच्या नोटाही एटीएममध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती एसबीआयच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी दिली.

सर्वप्रथम या नोटा एसबीआयच्या एटीएममध्ये उपलब्ध होणार असून, त्यानंतर 20 आणि 50 च्या नोटा इतर बँकांच्याही एटीएममधून मिळू लागल्यास लोकांना दैनंदिन व्यवहार करणं फायदेशीर ठरणार आहे, असंही अरुंधती भट्टाचार्य म्हणाल्या आहेत. त्यामुळे एसबीआय एटीएममध्ये 20 आणि 50 च्या नोटा कधी उपलब्ध करते, ग्राहकांमध्ये याची प्रचंड उत्सुकता लोकांना लागून राहिली आहे. तसेच 20 आणि 50च्या नोटा उपलब्ध झाल्यास पहिल्यांदाच 100 रुपयांखालील रकमेच्या नोटा एटीएममधून बाहेर येणार आहेत.

दरम्यान, काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यानं त्याची फारच चर्चा झाली. 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर नोटांसंदर्भात देशभरात गोंधळ होता. मात्र अरुंधती भट्टाचार्य यांच्या या वक्तव्यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

६९ वर्षांनंतर खगोलअभ्यासकांना पर्वणी : चंद्र १४ टक्के मोठा व ३० टक्के जादा प्रकाश ,

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 14 : कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वी व चंद्र यांच्यातील अंतर सर्वात कमी राहिल्याने जळगावकरांना सुपरमूनचे मनोहारी दर्शन सोमवारी घडले. ६९ वर्षानी झालेल्या या घटनेमुळे खगोल अभ्यासकांसाठी पर्वणी ठरली. सोमवारी रोज दिसणाऱ्या चंद्रापेक्षा १४ टक्के मोठा व ३० टक्के जादा प्रकाश देणाऱ्या चंद्राचे दर्शन जळगावकरांना झाले.

पृथ्वीभोवती एक महिन्यात एक प्रदक्षिणा करणारा चंद्र दररोज विविध कलांच्या माध्यमातून १२ अंश या प्रमाणात फिरतो. आपल्या कक्षेतून भ्रमण करताना चंद्र व पृथ्वी यातील अंतर कमी-अधिक होत असल्याने चंद्रप्रकाशातही बदल होत असतो. सोमवारी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वी व चंद्र यांच्यातील अंतर दोन लाख ५६ हजार ५११ किलोमीटर इतके राहिले. नियमित दिवशी चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर तीन लाख ८१ हजार इतके असते. रोज दिसणाऱ्या चंद्रापेक्षा सोमवारी चंद्र १४ टक्के मोठा दिसत होता. ३० टक्के जादा प्रकाश देत असल्याने खगोल अभ्यासकांसाठी चंद्राचे निरीक्षण ही पर्वणी ठरली.

८८ तारकासमुहांच्या आकाशात विविध मनोहारी घटना अधूनमधून घडत असतात. या घटना पाहण्याची इच्छा खगोल प्रेमींना असते. यापुढे सन २०३४ मध्ये सुपरमून पहायला मिळणार आहे. त्यावेळी चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर २ लाख २१ हजार ४८५ इतके राहणार आहे. आजच्या दिवशी चंद्र हा गोलाकार न फिरता लंबवर्तुळाकार फिरत असतो.

गेल्या ६९ वर्षांनंतर सुपरमून दिसणार आहे. रोज दिसणाऱ्या चंद्रापेक्षा १४ टक्के मोठा दिसत होता. सुपरमूनच्या पर्वणीच्या वेळी गुरुत्वाकर्षण वाढत असल्याने भूकंप, त्सुनामीची शक्यता सर्वाधिक असते. या काळात भरती व आहोटी जास्त प्रमाणात होते.

सतीश पाटील, खगोल अभ्यासक, जळगाव.

Saturday, 12 November 2016

नोटांची छपार्इ सर्वोच्च क्षमतेने सुरु : रिझर्व्ह बँक

मुंबर्इ, १२ नोव्हेंबर, (हिं.स.) : सध्या जरी नागरिकांना चलनी नोटांची चणचण भासत असली, तरीही नोटांची छपार्इ सर्वोच्च क्षमतेने सुरू आहे, असे स्पष्टीकरण रिझर्व्ह बँकेकडून आज येथे देण्यात आले. नोटांची उपलब्धता आणि मागणी यात तफावत असेपर्यंत क्रेडिट आणि डेबीट कार्ड यांचा वापर करून व्यवहार करावे, असे आवाहनही बँकेने केले आहे.

देशभरातील ४ हजार ठिकाणी मुबलक प्रमाणात चलनी नोटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पण मागणी आणि उपलब्धता यात तफावत आहे. नोटांबाबतच्या या मोठया बदलाचा विचार करता नोटांची मागणी पूर्ण करण्यासाठी चलनी नोटांची छपार्इ सर्वोच्च क्षमेतेने सुरू आहे, असे पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार / विराज भागवत / चंद्रहास मिरासदार

Dailyhunt

Wednesday, 9 November 2016

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या पत्रकात सामान्य व्यक्तीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यात आलं आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या पत्रकात सामान्य व्यक्तीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यात आलं आहे.

*या योजनेची गरज का पडली?*

उ. काळा पैसा, बनावट नोटा आण दहशतवाद्यांना पुरवला जाणारा पैसा रोखण्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेण्याची गरज पडली. बनावट नोटा चलनात मिसळल्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. या नोटा हद्दपार करण्यासाठी हे महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं.

*काय आहे योजना?*

उ. चलनातून 500, 1000 च्या नोटा रद्दबातल करण्यात आल्या आहेत. कसल्याही व्यवहारासाठी या नोटांचा वापर करता येणार नाही. केवळ 11 नोव्हेंबरपर्यंत रुग्णालये, पेट्रोल पंप, रेल्वे स्टेशन, विमानतळ या ठिकाणी या नोटांचा वापर करता येणार आहे. तुमच्याकडील 500, 1000 च्या नोटा आरबीआयचे देशातील 19 कार्यालये, कोणतीही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करता येणार आहेत.

*नोटांच्या बदल्यात काय मिळणार?*

उ. जमा केलेल्या रक्कमेच्या मोबदल्यात तुम्हाला सर्व रक्कम जशास तशी मिळणार आहे. यामध्ये कुणालाही तोटा होणार नाही.

*जुन्या नोटांच्या बदल्यात पैसे लगेच मिळणार का?*

उ. नाही, प्रति व्यक्ती केवळ 4 हजार रुपये मिळतील. बाकी रक्कम तुमच्या खात्यात जमा राहिल.

*सर्व नोटा जमा केल्या तरी तातडीने बदलून का मिळणार नाहीत?*

उ. या योजनेत अशी सुविधा देण्यात आलेली नाही. कारण 100 च्या नोटांचा तुटवडा निर्माण होईल म्हणून टप्प्याटप्प्याने नोटा बदलून मिळतील.

*4 हजार रुपये माझ्या गरजेसाठी कमी आहेत, मग काय करु?*

उ. इतर गरजांसाठी तुम्ही मोबाईल बँकिंग, फंड ट्रान्सफर, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यांचा वापर करु शकता.

*माझं कोणत्याही बँकेत खातं नसेल तर काय करायचं?*

उ. कागदपत्र जमा करुन कोणत्याही बँकेत खाते उघडू शकता.

*माझ्याकडे फक्त जनधन योजनेंतर्गत उघडलेलं खातं आहे, तर काय करावं?*

उ. जनधन योजनेंतर्गत खाते असणाऱ्या खातेधारकांना जुन्या नोटा जमा करुन त्याबदल्यात बदल्यात नव्या नोटा मिळतील.

*माझ्याकडील नोटा कुठे-कुठे बदलून मिळतील?*

उ. तुमच्याकडच्या 500, 1000 च्या नोटा रिझर्व्ह बँकेची सर्व कार्यालये, बँक शाखा किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बदलून मिळतील.

*मला फक्त माझं खातं असलेल्या बँकेतच जावं लागेल का?*

उ. 4 हजार रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी आवश्यक कागदपत्र घेऊन तुम्ही कुठल्याही बँकेत जाऊ शकता. मात्र त्यापेक्षा अधिक रक्कम जमा करण्यासाठी तुमचं खातं असलेल्या बँकेतच जावं लागेल.

जर तुमचं कोणत्याच बँकेत खातं नसेल तर आरबीआयने जारी केलेला नोटा बदली फॉर्म भरुन सोबत पॅन कार्ड, आधार कार्ड अशा आवश्यक कागदपत्रांसह बँकेत तुमची माहिती द्यावी लागेल. मग तिथे तुम्हाला नोटा बदलून मिळतील.

*मी माझ्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊ शकतो का?*

उ. होय

*माझ्या बँकेशिवाय कोणत्याही बँकेतून नोटा बदलून मिळतील का?*

उ. होय. आवश्यक कागदपत्रांसह 4000 रुपयांपर्यंतची रक्कम कोणत्याही बँकेतून बदलून घेऊ शकता.

*माझं बँकेत खातं नाही. मात्र माझ्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या खात्यामार्फत पैसे बदलून घेऊ शकतो का?*

उ. जर तुम्हाला तुमचे नातेवाईक किंवा मित्र लेखी परवानगी देत असतील तर तुम्ही त्यांच्या खात्यामार्फत नोटा बदलून घेऊ शकता.

*मला स्वतःलाच बँकेत जावं लागेल, की इतर कोणाला पाठवलं तर चालेल?*

उ. जर तुम्ही स्वतः बँकेत गेलात तर उत्तमच आहे. मात्र तुम्हाला वेळ नसेल तर तुमच्या प्रतिनिधीला परवानगी पत्र देऊन पाठवू शकता. प्रतिनिधीजवळ तुमचं एखादं ओळखपत्र असणंही गरजेचं आहे.

*मी एटीएममधून पैसे काढू शकतो का?*

उ. यासाठी काही वेळ लागणार आहे. बँकांनी एटीएममध्ये 100 च्या नोटा भरल्यानंतर तुम्हाला पैसे काढता येतील. 18 नोव्हेंबरपर्यंत दररोज केवळ 2 हजार रुपये एटीएममधून काढता येतील. 19 नोव्हेंबर नंतर ही मर्यादा 4 हजार रुपयांपर्यंत वाढवली जाईल.

*मी चेकने पैसे काढू शकतो का?*

उ. चेकने पैसे काढता येतील. चेकने पैसे काढण्याची कमाल मर्यादा 10 हजार दररोज आणि आठवड्याला 20 हजार रुपये एवढीच आहे. म्हणजे तुम्ही आठवड्यातून दोनदाच पैसे काढू शकता. 24 नोव्हेंबरपर्यंत ही मर्यादा लागू आहे.

*एटीएम, कॅश डिपॉझीट मशिन यांच्यामार्फत पैसे जमा करु शकतो का?*

उ. होय

*मी मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, ऑनलाईन फंड ट्रान्सफर या सुविधांचा वापर करु शकतो का?*

उ. होय

*माझ्याकडच्या नोटा कधीपर्यंत बदलून घेऊ शकतो?*

उ. ही योजना 30 डिंसेबरला बंद होणार आहे. त्यामुळे दिलेल्या कालावधीतच नोटा जमा कराव्या लागतील. मात्र या कालावधीत ज्यांना नोटा जमा करणं शक्य नाही, त्यांनाही पुन्हा जुन्या नोटा बदलून घेण्याची संधी मिळणार आहे. आरबीआयच्या ठराविक कार्यालयांमध्ये प्रतिज्ञापत्रासह या नोटा जमा करता येतील. या प्रतिज्ञापत्रात तुम्ही तुमच्याकडील पैशाचा स्रोत सांगणं गरजेचं आहे.

*मी सध्या भारताबाहेर आहे, तर काय करावं?*

उ. तुम्ही तुमच्या कोणत्याही नातेवाईकामार्फत पैसे जमा करु शकता. त्यासाठी नातेवाईकाकडे तुमचा अर्ज, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट, मतदान कार्ड यापैकी कोणतेही अधिकृत ओळखपत्र जवळ असणं गरजेचं आहे.

*मी अनिवासी भारतीय आहे, माझं बँक खातंही एनआरओ असेल तर काय पर्याय आहे?*

उ. तुम्ही तुमच्या याच खात्यात पैसे जमा करु शकता

*मी परदेशी पर्यटक आहे, माझ्याकडच्या नोटांचं काय करावं?*

उ. एअरपोर्ट एक्स्चेंज काऊंटवर जाऊन तुम्ही तुमच्या नोटा बदलून घेऊ शकता.

    *23. मला (रुग्णालय, औषध खरेदी, प्रवास) यांसाठी पैशांची गरज असेल तर काय करावं?*

उ. रेल्वे स्थानक, रुग्णालये, बस स्थानक, एअरपोर्ट अशा ठिकाणी 11 नोव्हेंबरपर्यंत जुन्या नोटा वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र औषध खरेदीसाठी डॉक्टरांची चिठ्ठी गरजेची आहे.

    *24. यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती?*

उ. आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट, मतदान कार्ड अशी कागदपत्र जवळ असणं गरजेचं आहे.

    *25. या योजनेविषयी अधिक माहिती मला कुठे मिळेल?*

उ. तुम्ही www.rbi.org.in या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता.

    *26. मला काही गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर मी काय करावं?*

उ. तुम्ही कधीही आरबीआयच्या publicquery@rbi.org.inया ईमेल वर तुमची समस्या पाठवू शकता. किंवा 022 22602201/022 22602944 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

Tuesday, 8 November 2016

मध्यरात्रीपासून 500-1000 रुपयांच्या नोट बेकायदेशीर- PM मोदींची घोषणा

**
*दिव्य मराठी वेब टीम* | Nov.8

नवी दिल्ली -  देशातील भ्रष्टाचार आणि काळेधन विकासाला अडसर ठरत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. याला आळा घालण्यासाठी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. याची अंमलबजावणी मंगळवार, 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. बुधवारपासून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा या केवळ कागदी तुकडे ठरतील, असे पंतप्रधान म्हणाले. त्याचवेळी 100, 50, 20, 10, 5, 2 आणि 1 रुपयांच्या नोटा आणि नाणे चलनात राहणार आहेत.

देशातील सामान्य नागरिक प्रामाणिक आहे. ऑटो रिक्शा, टॅक्सी ड्रायव्हर त्याच्या वाहनात सापडलेले पैशांचे पाकिट प्रामाणिकपणे परत करतो. मात्र काही लोक आपल्या पदाचा गैरवापर करुन कोट्यवधींची काळी संपत्ती जमा करतात. भ्रष्टाचार आणि काळे धन यामुळे देशाच्या विकासाला गती मिळत नाही, असे सांगत पंतप्रधानांनी देशात 80 ते 90 टक्के चलन हे 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांच्या रुपाने चलनात असल्याचे सांगितले.

500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्यात आल्यानंतर ज्यांच्याकडे या नोटा असतील त्यांनी 30 डिसेंबर पर्यंत त्या बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये जमा करण्यास सांगण्यात आले आहे.


देशातून गरीबीच्या उच्चाटनामध्ये काळेधन हे सर्वात मोठी अडचण ठरत आहे. देशातील सामान्य नागरिक प्रामाणिक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. काळेधन, भ्रष्टाचार, दहशतवाद हे देशाला विकासाच्या शर्यतीत मागे ढकलत असल्याचे मोदी म्हणाले.

दहशतवाद आणि बनावट नोटांच्या माध्यमातून देशाला उद्धवस्त केले जात आहे.
आमच्या सरकारने सुरुवातीपासून भ्रष्टाचार आणि काळ्या धनाविरोधात अनेक पाऊले उचलली असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- देशाला भ्रष्टाचार आणि काळ्या धनाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आणखी कडक कारवाईची गरज.
- 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांवर आज (8 नोव्हेंबर) रात्री 12 वाजतापासून बंदी.
- 30 डिसेंबरपर्यंत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बँक आणि पोस्टात जमा करता येतील.