**
*दिव्य मराठी वेब टीम* | Nov.8
नवी दिल्ली - देशातील भ्रष्टाचार आणि काळेधन विकासाला अडसर ठरत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. याला आळा घालण्यासाठी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. याची अंमलबजावणी मंगळवार, 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. बुधवारपासून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा या केवळ कागदी तुकडे ठरतील, असे पंतप्रधान म्हणाले. त्याचवेळी 100, 50, 20, 10, 5, 2 आणि 1 रुपयांच्या नोटा आणि नाणे चलनात राहणार आहेत.
देशातील सामान्य नागरिक प्रामाणिक आहे. ऑटो रिक्शा, टॅक्सी ड्रायव्हर त्याच्या वाहनात सापडलेले पैशांचे पाकिट प्रामाणिकपणे परत करतो. मात्र काही लोक आपल्या पदाचा गैरवापर करुन कोट्यवधींची काळी संपत्ती जमा करतात. भ्रष्टाचार आणि काळे धन यामुळे देशाच्या विकासाला गती मिळत नाही, असे सांगत पंतप्रधानांनी देशात 80 ते 90 टक्के चलन हे 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांच्या रुपाने चलनात असल्याचे सांगितले.
500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्यात आल्यानंतर ज्यांच्याकडे या नोटा असतील त्यांनी 30 डिसेंबर पर्यंत त्या बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये जमा करण्यास सांगण्यात आले आहे.
देशातून गरीबीच्या उच्चाटनामध्ये काळेधन हे सर्वात मोठी अडचण ठरत आहे. देशातील सामान्य नागरिक प्रामाणिक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. काळेधन, भ्रष्टाचार, दहशतवाद हे देशाला विकासाच्या शर्यतीत मागे ढकलत असल्याचे मोदी म्हणाले.
दहशतवाद आणि बनावट नोटांच्या माध्यमातून देशाला उद्धवस्त केले जात आहे.
आमच्या सरकारने सुरुवातीपासून भ्रष्टाचार आणि काळ्या धनाविरोधात अनेक पाऊले उचलली असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- देशाला भ्रष्टाचार आणि काळ्या धनाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आणखी कडक कारवाईची गरज.
- 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांवर आज (8 नोव्हेंबर) रात्री 12 वाजतापासून बंदी.
- 30 डिसेंबरपर्यंत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बँक आणि पोस्टात जमा करता येतील.
No comments:
Post a Comment